मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते मिलींद नार्वेकर यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी आपल्या सहकार्यांसह त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मिलींद नार्वेकर यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. सध्या राज्यात अनेक वेगवान घडामोडी घडत असतांना शिवसेनेत फुट पडली असून पक्षातील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा मार्ग निवडला आहे. यात विलक्षण नाट्यमय घटनांनंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. अर्थात, उध्दव ठाकरे यांचे निष्ठावंत आणि शिंदे समर्थक यांचे राजकीय मार्ग वेगळे झाले आहेत. मात्र अजून देखील दोन्ही गटांमध्ये सलोखा असल्याचे आज दिसून आले आहे.
राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी आज मिलींद नार्वेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी शोकसंवेदना व्यक्त करत नार्वेकर कुटुंबाला यातून सावरण्याचे बळ देण्याची प्रार्थना केली. याप्रसंगी आ. गुलाबराव पाटील यांच्या सोबत त्यांचे आधीच्या मंत्रालयातील सहकारी संजय राठोड, सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे आदींची देखील उपस्थिती होती. यातून राजकीय वाटा वेगळा झाल्या तरी शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या अनेक नेत्यांनी संबंध जोपासल्याचे दिसून आले आहे.