धरणगाव-अविनाश बाविस्कर । जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे पाचव्यांदा तर सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहे. तर विरोधात असलेले महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा दारून पराभव झाला आहे. गुलाबराव पाटील यांनी तब्बल ५९ हजार २३२ मतांनी देवकरांचा पराभव केला आहे.
जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूकीत मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. निवडणूकीच्या प्रचारादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. मंगळवारी १९ नोव्हेंबर रोजी जळगाव ग्रामीण मतदार संघात एकुण ६९.३३ टक्के मतदान झाले होते. या दोघा उमेदवारांमध्ये नशिराबाद व धरणगाव या दोन्ही गावांमध्ये काट्याची लढत पाहायला मिळाली. नशिराबादमध्ये गुलाबराव देवकर यांना २३ मतांची आघाडी मिळाली, तर धरणगावमध्ये गुलाबराव पाटील यांना ७२६ मतांची आघाडी मिळाली. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना मतमोजणीच्या दिवशी सुरूवातील काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली होती. मतमोजणीत २६ फेऱ्या घेण्यात आले. मतमोजणीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरूवातील फेऱ्या वगळता इतर सर्व फेऱ्यांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली. तर त्यांनी विरोधात असलेल्या सर्व उमेदवारांचा सुपडा साफ करत मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. यात गुलाबराव पाटील यांना १ लाख ४२ हजार ५९१ तर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर ८३ हजार ४६१ मते मिळाली, मनसेचे मुकुंद आनंद रोटे यांना १ हजार ६१२, वंचितचे प्रवीण जगन सपकाळे यांना १ हजार ४२४ अशी मते मिळाली आहे.
गुलाबराव देवकरांना १६६ गावांपैकी केवळ २४ गावांमध्ये लीड मिळाल्याचे पहायला मिळाले. तर गुलाबराव पाटील यांना १४२ मध्ये मोठा लिड मिळाल्याचे दिसून आले. या निवडणुकीच्या निकालात गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांचा तब्बल ५९ हजार २३२ मतांनी पराभव केला. एकंदरीत महायुतीत असतांना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असतांना शिंदे गटाच्या उमेदवरांसाठी मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. शिवाय शासनाकडून राबविण्यात आलेल्या लाडकी बहिण योजना आणि शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्याने लाकड्या बहिणींनी भावांसाठी मतदान केल्याचे दिसून आले.