Home Cities जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ‘ओरियन स्कूल’च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ‘ओरियन स्कूल’च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जागतिक न्याय दिनाचे औचित्य साधून ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक विशेष कायदेशीर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम क्यू एस एम शेख यांच्या आदेशान्वये आणि सचिव पवन एच. बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११:०० वाजता हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पवन एच. बनसोड, उप-मुख्य लोकअभिरक्षक अ‍ॅड. मंजुळा मुंदडा आणि सहायक लोक अभिरक्षक अ‍ॅड. शिल्पा व्ही. रावेरकर यांनी विविध महत्त्वाच्या आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित कायदेशीर बाबींवर सखोल मार्गदर्शन केले.

यामध्ये ‘मुलांचे हक्क’, ‘शिक्षणाचा हक्क’, ‘बाल न्याय’, ‘लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO Act)’ (विशेषतः त्याची सुरक्षा आणि गोपनीयता), ‘राष्ट्रीय कायदेशीर मदत क्रमांकाची माहिती’, ‘नागरिकांची मूलभूत कर्तव्ये’ आणि ‘पॉश कायदा (POSH Act)’ (कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण) यांसारख्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर उपस्थित विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना माहिती देण्यात आली.

यावेळी ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या श्रीमती सुषमा कांची आणि उप-प्राचार्या श्रीमती मेघना राजकोटिया यांची विशेष उपस्थिती होती. मेघना राजकोटिया यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले आणि उपस्थितांचे आभार मानले. जनजागृतीचा एक भाग म्हणून, विविध कायदेशीर योजनांची माहिती देणाऱ्या पॅम्पलेट्सचे वाटपही यावेळी करण्यात आले.


Protected Content

Play sound