यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील दहिवद शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल अॅण्ड न्यूरोसायन्स (NIMHANS) यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य तपासणी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले.
या शिबिराचे उद्घाटन शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी जी. आर. एम. लवणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जी. जी. संदीप पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातील शासकीय अनुदानीत आदिवासी आश्रमशाळांमधील शाळा अधीक्षक आणि अधीक्षिका यांना दोन दिवसांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षण शिबिरात एकूण १०४ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमधील मानसिक समस्या ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करणे, आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाय राबवणे हा होता. प्रशिक्षक म्हणून प्रकल्पाचे मास्टर ट्रेनर गणेश तांदळे, जिम पल्लवी सोनोने आणि जिम प्रियंका राठोड यांनी मार्गदर्शन करत अनेक महत्त्वाचे मुद्दे उलगडले. विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा मानसिक तणाव, अभ्यासावरील दडपण आणि कौटुंबिक अडचणी यांसारख्या समस्या ओळखण्याचे कौशल्य प्रशिक्षणार्थींना दिले गेले.
शाळांमधील अधीक्षक आणि अधीक्षिकांनी प्रत्यक्ष अनुभवांद्वारे प्रशिक्षणाचा लाभ घेतला आणि भविष्यात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी प्रभावी भूमिका बजावण्याचा निर्धार व्यक्त केला. शिबिरात सहभागी झालेल्यांनी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले असून असे शिबीर दरवर्षी घेण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासंबंधीची जाणीव अधिक दृढ झाली असून, भावी काळात शाळांमधील मानसिक आरोग्यविषयीचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होईल, अशी अपेक्षा आहे.



