Home Cities जळगाव भाजप अल्पसंख्यांक मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांचे मार्गदर्शन

भाजप अल्पसंख्यांक मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांचे मार्गदर्शन


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या संघटनात्मक बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा हज कमिटीचे चेअरमन (केंद्रीय राज्य मंत्री दर्जा) ना. जमालभाई सिद्दीकी यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सूचना दिल्या. पक्षाच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी आणि अल्पसंख्यांक समाजाशी अधिक सशक्त संवाद साधण्यासाठी ही बैठक मार्गदर्शक ठरली.

ही बैठक १७ ऑक्टोबर रोजी जळगाव येथील भाजपा कार्यालय, जी.एम. फाउंडेशन येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. अस्लम, प्रदेश उपाध्यक्ष तथा हज कमिटी संचालक मा. सलीम बागवान, भाजपा जिल्हाध्यक्ष (पश्चिम) डॉ. राधेश्याम चौधरी, तसेच महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी डॉ. चौधरी आणि सूर्यवंशी यांनी जमालभाई सिद्दीकी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

बैठकीत जिल्हा, महानगर आणि प्रदेश स्तरावरील कार्यकारिणी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अल्पसंख्यांक मोर्चाच्या संघटनाला अधिक मजबूत करण्यासाठी, पक्षाचे कार्य प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी सिद्दीकी यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, “भाजप ही सर्व समाजघटकांचा विश्वास संपादन करणारी आणि राष्ट्रहितासाठी कार्य करणारी पक्षसंस्था आहे. अल्पसंख्यांक समाजालाही या विकासयात्रेत समान भागीदारी मिळायला हवी.”

या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष ऍड. साहेबज शेख आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य जहांगीर ए. खान यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच बैठकीला उदय भालेराव, धीरज वर्मा, अ. रऊफ शेख, याकूब खान, अकबर काकर, आसिफ शेख, ईद्रीस शेख, वसीम शेख, जमील शेख, वसीम पटेल, रहीम शेख (जामनेर), शब्बीर अली सय्यद, अफसर शेख, रज्जाक खान, अनिस शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

सिद्दीकी यांनी पक्षातील शिस्त, संघभावना, आणि परस्पर संवाद यावर भर देत अल्पसंख्यांक समाजात पक्षाची विचारधारा अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्याचे आवाहन केले. त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकाऱ्याने तळागाळात कार्यरत राहून पक्षाचा संदेश पोहोचवावा, असेही सांगितले.


Protected Content

Play sound