अस्तंभा ऋषीच्या यात्रेतून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघातात ७ ठार, ८ गंभीर जखमी


नंदुरबार – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धडगाव तालुक्यातील प्रसिद्ध अस्तंभा (अश्वत्थामा) ऋषीच्या यात्रेहून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात होऊन सात भाविकांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. चांदशैली घाटातील खोल दरीत पिकअप गाडी कोसळल्याने हा अपघात झाला. ही दुर्घटना रविवार, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली असून संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धडगाव तालुक्यातील असली येथे भरवली जाणारी अस्तंभा ऋषीची यात्रा लाखो भाविकांसाठी श्रद्धास्थान असते. यंदाही वसुबारसच्या दिवशी अनेक भाविक दर्शनासाठी गेले होते. त्यात नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील सुमारे २५ भाविकांचा समावेश होता. दर्शन आटोपून हे भाविक परतीच्या मार्गावर असताना चांदशैली घाटात पिकअप गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट खोल दरीत कोसळली.

या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले असून यामध्ये पाच जण नंदुरबार तालुक्यातील घोटाणे गावचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातातील आठ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमी असलेल्यांना तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त भाविकांना मदत करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. वाहतूक कोंडी आणि दरीतील अपघातामुळे बचावकार्यात अडथळे आले, तरी पोलिस आणि नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात वेळेवर दाखल करण्यात आले. सध्या तळोदा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या अपघातामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दीपावलीसारख्या आनंदाच्या सणात अशा दुर्दैवी घटनेमुळे संबंधित गावात हळहळ आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.