Home Cities यावल यावल महाविद्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर; शासकीय योजनांची माहिती

यावल महाविद्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर; शासकीय योजनांची माहिती


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील मराठा समाज विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती व शैक्षणिक संधींबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय आणि प्रकल्प यांच्यात करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या (MoU) अनुषंगाने हा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात प्रा. रत्नाकर कोळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक सुविधा तसेच विविध सवलतींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या योजनांचा योग्य लाभ कसा घ्यावा आणि भविष्यातील संधी कशा ओळखाव्यात यावरही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला प्रा. नरेंद्र पाटील यांनी प्रमुख उपस्थिती म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्रा. सी. टी. वसावे यांनी केले, तर प्रा. अरुण पावरा यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

या मार्गदर्शन शिबिरामुळे महाविद्यालयातील आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळाली असून त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक दिशा मिळाली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते आणि त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

 


Protected Content

Play sound