जळगाव प्रतिनिधी । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ ही किती घट्ट आहे याची प्रचिती देणारी एक घटना आज घडली असून दुर्धर व्याधीशी दोन हात करणार्या चिमुकलीच्या उपचारासाठी त्यांनी स्वत: आर्थिक मदत तर केलीच, पण हॉस्पीटलमध्ये भेट देऊन तिला व तिच्या कुटुंबाला धीर देखील दिला.
याबाबत वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील कुमारी मेघना अरूण माळी ही जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पाचव्या इयत्तेत शिकणारी बालिका सध्या गिलीन बार सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या दुर्धर व्याधीशी झुंजत आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या घरची आर्थिक स्थिती यथातथा असल्याने कुटुंबाने असेल ती पुंजी जमा करून लावली तरीही खर्च पुरेना झाला. यामुळे काही जणांनी मदतीचा हात दिला तरी अजून पैसे लागत होते. ही माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट नाशिक येथे मेघना उपचार घेत असलेल्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे हॉस्पीटल गाठून तिला धीर दिला.
याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मेघनाचा उपचारासाठी तात्काळ एक लाख रूपयांची आर्थिक मदत करून पुढील उपाचारासाठीही लागेल ती मदती साठी कटिबद्ध असून तसेच तिला आणि तिच्या कुटुंबाला काहीही लागले तर हक्काने सांगा…आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगून आश्वस्त देखील केले.
पालकमंत्र्यांचे आपल्या मतदारांवरील प्रेम पाहून मेघनासह तिचे कुटुंब भारावून गेले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, नारायण आप्पा सोनवणे, मंत्रालयातील स्वीय सहाय्यक एन.एस. पाटील आदी उपस्थित होते.