Home Cities बोदवड बोदवडमध्ये आ. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

बोदवडमध्ये आ. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन


बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड शहराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा आज पार पडला. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत “पाणीपुरवठा योजना जलकुंभ क्र.२” या महत्त्वाकांक्षी योजनेचे भूमिपूजन आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेमुळे बोदवडकरांना शुद्ध, स्वच्छ आणि सातत्याने पाणीपुरवठा होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

तापी नदीवरून पाणी आणण्याची ही योजना असून त्यात विशेषतः पाण्यातील गाळ कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्याचा लाभ होणार असून, आरोग्यविषयक समस्या कमी होतील. बोदवडसारख्या वाढत्या शहरासाठी ही योजना जीवनदायिनी ठरणार आहे. आमदार पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले की, “बोदवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.”

या भूमिपूजन सोहळ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, तालुकाप्रमुख नवनीत पाटील व प्रमोद धामोडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख हितेश पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे यांच्यासह महायुतीतील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोदवड नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नागरिकांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या प्रसंगी शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

या पाणीपुरवठा योजनेमुळे केवळ शहरातील पाण्याची गरज भागणार नाही, तर भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक गरजांनाही सामोरे जाणे शक्य होणार आहे. त्यामुळे ही योजना बोदवडच्या विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे.


Protected Content

Play sound