छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव बुद्रूक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्या हस्ते रविवार, दि. ६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम नवमीच्या शुभदिनी संपन्न झाले. या कार्यक्रमाला तालुक्यातील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदवी स्वराज्य सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मोहन रमेश पाटील यांनी दि. ३१ जानेवारी रोजी किनगाव बुद्रूक ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. भारती पाटील यांच्याकडे गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी जागेची मागणी केली होती. यावर तातडीने बैठक घेऊन सरपंच सौ. भारती पाटील यांनी पुतळ्यासाठी जागा नियोजित करून दिली. या कार्याला यावल तालुक्याचे माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी पुतळा उभारणीसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिल्याने या प्रकल्पाला गती मिळाली.

या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीचे अध्यक्ष मोहन रमेश पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे उपाध्यक्ष व यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत (छोटू आबा) रामराव पाटील उपस्थित होते. याशिवाय माजी सरपंच भारती प्रशांत पाटील, सरपंच स्नेहल मिलिंद चौधरी यांच्यासह श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती, किनगावचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

या कार्यक्रमाद्वारे किनगाव बुद्रूक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कार्याला सुरुवात झाली असून, येत्या काळात हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी सर्व स्तरांवरून सहकार्य मिळत आहे.

Protected Content