चोपडा, प्रतिनिधी | महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल.चौधरी हे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी एन. एस. कोल्हे यांनी सांगितले की, “महात्मा फुले यांनी त्या काळातील गुलामगिरीविरुद्ध बंड पुकारून अस्पृश्यांच्या शैक्षणिक समाजिक उन्नतीसाठी कार्य केले. पहिली मुलींची शाळा पुणे येथील भिडे वाडा येथे उघडून स्त्री शिक्षणाची सुरवात केली. बालहत्या प्रतिबंध, सत्यशोधक समाजाची स्थापना, अनाथ आश्रमांची निर्मिती केली असे त्यांनी सांगितले.” उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे यांनी कुसुमाग्रज यांच्या कवितेच्या आधारे महात्मा फुले यांच्या विचारांची मांडणी केली. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, समाजसुधारणा यासंबंधीचे विचार मांडले. सूत्रसंचालन डी. डी.कर्दपवार यांनी केले. तर आभार बी. बी.पवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी व्ही. बी. पाटील, एम. एल. भुसारे, पी. जे. बेहेरे, एस. एस. चौधरी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी बहुसंख्य व विद्यार्थी उपस्थित होते.