यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । किनगावजवळील डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये शनिवार, दिनांक २६ रोजी ‘ग्रीन डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात हिरवळ जपण्याचा संदेश देत सहभाग नोंदविला. संपूर्ण शाळा हिरव्या रंगात न्हाल्याने निसर्गाचा प्रसन्न श्वास वातावरणात दरवळत होता.
या वेळी विद्यार्थी, विद्यार्थिनींसह सर्व शिक्षकवृंदांनी हिरव्या रंगाचे पोशाख परिधान केले होते. निसर्गप्रेमाचे प्रतीक असलेल्या हिरव्या रंगात रंगून शाळेचा परिसर हिरवळीत न्हाऊन निघाला. कार्यक्रमाची सुरुवात ‘ग्रीन डे’ विषयी प्रतिज्ञा घेऊन झाली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाविषयी आपली जबाबदारी अधोरेखित करत झाडांची कत्तल न करण्याचे आश्वासन दिले. झाडांचे महत्त्व समजावून सांगण्याची जबाबदारी आपण पार पाडू असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागरूकतेस पूरक गीतांवर सुंदर नृत्य सादर करत रसिकांची मने जिंकली. काही विद्यार्थ्यांनी फळभाज्या व पालेभाज्यांच्या वेषात साकारत त्या अन्नघटकांचे आरोग्यदायी फायदे विशद केले. यामुळे सर्वांना पौष्टिक आहाराचे महत्त्व पटले. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. हातात फलक घेऊन, घोषणांनी परिसर दुमदुमवित त्यांनी विविध ठिकाणी झाडे लावून ग्रीन डे साजरा केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, सचिव मनिष विजयकुमार पाटील, संचालिका सौ. पूनम मनिष पाटील, मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव आणि इ. १ ली ते इ. ४ थीचे सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.
एकूणच, विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच पर्यावरणप्रेमाची बीजे रोवण्याचा हेतू या कार्यक्रमातून सफल झाला. ‘ग्रीन डे’ निमित्ताने बालमनात निसर्गाविषयी जागरूकता निर्माण होऊन भविष्यातील हिरवळ जपणारे जबाबदार नागरिक घडतील अशी आशा निर्माण झाली आहे.



