भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच आगमन झाल्यानंतर ना. रक्षाताई खडसे यांचे आज पहाटे भुसावळ रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार रक्षाताई निखील खडसे यांनी दणदणीत मताधिक्याने बाजी मारली होती. यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या पहिल्याच विस्तारात त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी देखील मिळाली. यात त्यांना केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली असून त्यांनी आपल्या मंत्रालयाचा कार्यभार देखील स्वीकारला आहे.
दरम्यान, लोकसभेचा निकाल लागल्यानंतर दोन दिवसांनी दिल्लीस गेलेल्या रक्षाताई खडसे या आज पहाटे मुंबई येथून भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्या असता त्यांचे अगदी जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांची रेल्वे गाडी फलाटावर थांबताच जोरदार जयघोष करत त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, ज्येष्ठ पदाधिकारी परिक्षीत बर्हाटे, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, पिंटू कोठारी, नितीन धांडे, यावल येथील डॉ. कुंदन फेगडे आदींसह भुसावळ शहर व तालुका तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.