जळगाव प्रतिनिधी । ना. गिरीश महाजन यांची जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच आगमन झाल्यावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
जलसंपदा तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे अलीकडेच जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे. ही घोषणा झाल्यानंतर ना. महाजन हे आज पहिल्यांदाच जिल्ह्यात आले आहेत. आज दुपारी गितांजली एक्सप्रेसने त्यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. याप्रसंगी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोषात गिरीशभाऊंचे स्वागत केले. यावेळी जोरदार घोषणांनी रेल्वे स्थानक परिसर दणाणून निघाला.
खासदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे, माजी महापौर ललीत कोल्हे, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, जि.प. सभापती पोपट भोळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. यानंतर अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी बोलतांना ना. गिरीश महाजन यांनी जिल्हा विकासाच्या कामाला चालना देण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले की, मला पालकमंत्री म्हणून फक्त तीन महिन्यांचा वेळ मिळणार आहे. मात्र या कमी वेळात चांगल्या प्रकारे विकासाला गती देण्याला माझे प्राधान्य राहणार आहे. जळगावचा विचार केला असता, समांतर रस्ते, शिवाजीनगर पूल, रस्ते आदींसह विविध कामे लवकरात लवकर मार्गी लागतील. तसेच जिल्ह्यातील सिंचनाच्या योजनांनाही गती देण्यात येणार असल्याची माहिती ना. गिरीश महाजन यांनी दिली.
पहा : ना. गिरीश महाजन यांच्या जोरदार स्वागताचा व्हिडीओ.