Home Cities चोपडा सतपंथ मंदिर जीर्णोद्धारानिमित्त दशावतारांची भव्य मिरवणूक 

सतपंथ मंदिर जीर्णोद्धारानिमित्त दशावतारांची भव्य मिरवणूक 


धानोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सतपंथ ज्योत मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त धानोरा (ता. चोपडा) येथे आयोजित करण्यात आलेल्या दशावतार मूर्त्यांच्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण गाव भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या गजरात पार पडलेल्या या सोहळ्यात २०० हून अधिक महिलांच्या कलशधारणेने मिरवणुकीला विशेष आकर्षण प्राप्त झाले, तर संपूर्ण गावातून सोडण्यात आलेल्या गावरान तुपाच्या अखंड धारेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

चतुर्विध महोत्सवानिमित्त शुक्रवारी (ता. १०) सकाळपासूनच गावात उत्साहाचे वातावरण होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली. फुलांनी आकर्षक सजवलेल्या ट्रॅक्टररूपी रथावर विराजमान दशावतार मूर्त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी २०० पेक्षा अधिक सुवासिनी महिलांनी डोक्यावर मंगल कलश धारण करून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला. त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमुळे आणि भक्तीभावामुळे वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. या वेळी महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज तसेच संत विजय प्रकाश महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या मिरवणुकीतील सर्वात वेगळे आणि लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे ‘गावरान तुपाची अखंड धार’. मिरवणूक ज्या मार्गाने पुढे सरकत होती, त्या मार्गावर एका विशेष मातीच्या पात्रातून शुद्ध गावरान तुपाची धार सतत सोडण्यात येत होती. गावात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी तसेच वातावरणात पावित्र्य टिकून राहावे, या श्रद्धेने ही परंपरा पाळण्यात आली. या सुगंधित धारेमुळे संपूर्ण गाव मांगल्याने भारावून गेले होते.

मिरवणुकीदरम्यान गावातील मुलींनी साकारलेल्या विविध देवींच्या आरासांनी सर्वांचे मन जिंकून घेतले. मनमोहक वेशभूषेत साकारलेल्या या देवीरूपांनी वातावरण अधिक भक्तिमय केले. याशिवाय दशावतारांच्या पात्रांची हुबेहूब सादरीकरणे पाहून उपस्थितांना पौराणिक काळाचा साक्षात्कार झाल्याची अनुभूती मिळाली. कलाकारांच्या जिवंत सादरीकरणाने संपूर्ण सोहळा अधिक रंगतदार झाला.

या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. आबालवृद्धांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेत देवदर्शनाचा लाभ घेतला. गावातील नागरिकांनी ठिकठिकाणी सडे-रांगोळ्या काढून मिरवणुकीचे स्वागत केले. जयघोषांनी दुमदुमलेल्या वातावरणात हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडला.


Protected Content

Play sound