Home धर्म-समाज पारोळ्यात आज भव्य रथोत्सवाचा जल्लोष! दीड लाख भाविकांची मांदियाळी ; ४३ फूट...

पारोळ्यात आज भव्य रथोत्सवाचा जल्लोष! दीड लाख भाविकांची मांदियाळी ; ४३ फूट उंच सागवानी रथ ठरणार आकर्षण

0
16


पारोळ्यात आज भव्य रथोत्सवाचा जल्लोष! दीड लाख भाविकांची मांदियाळी ; ४३ फूट उंच सागवानी रथ ठरणार आकर्षण तालुक्याचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराज संस्थानच्या वतीने आज, गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी पारोळा येथे पारंपरिक आणि ऐतिहासिक रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या रथोत्सवासाठी संस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, दुपारी साधारण एक वाजता रथ हलविण्याचा मुहूर्त आहे. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने पारोळ्यात दाखल होत असून, यंदा सुमारे एक ते दीड लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ४३ फूट उंचीचा भव्य सागवानी रथ, आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई यामुळे संपूर्ण पारोळा नगरी भक्तिमय वातावरणाने दुमदुमणार आहे.

पारोळ्याच्या रथोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे श्री बालाजी महाराजांचा भव्य, देखणा आणि कलाकुसरीने नटलेला रथ. सुमारे ४३ फूट उंचीचा हा रथ महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच रथांपैकी एक म्हणून ओळखला जातो. शेकडो टन वजन असलेल्या या रथाची भव्यता, सागवानी लाकडावरील अप्रतिम कलाकुसर आणि त्यातून जपलेला धार्मिक वारसा भाविकांना विशेष आकर्षित करतो. सन १९६७ मध्ये या भव्य रथाची निर्मिती करण्यात आली होती. माधव रामजी आणि त्यांचे बंधू त्र्यंबक, बंशी व रघुनाथ या कुशल मिस्त्री बांधवांनी मेहनत आणि कलात्मक कौशल्याच्या जोरावर या रथाची उभारणी केली. रथावर भगवान विष्णूंचे दहा अवतार कोरण्यात आले असून, दोन्ही बाजूंना राक्षसांच्या भव्य मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. अर्जुनाच्या रथाची आठवण करून देणारी घोड्यांची रचना हेही या रथाचे वैशिष्ट्य आहे. रथाच्या मध्यभागी असलेल्या सिंहासनावर श्री बालाजी महाराजांची मूर्ती विराजमान केली जाते. रथाच्या विविध बाजूंनी भाविकांना दर्शन घेता येत असल्याने रथोत्सवाच्या दिवशी या रथाभोवती भाविकांची मोठी गर्दी जमते.

रथोत्सवात जाड नाड्यांच्या साहाय्याने भाविक आणि सेवेकरी रथ ओढतात. ‘लक्ष्मी रमणा गोविंद, बालाजी महाराज की जय’ या जयघोषात रथाचे मार्गक्रमण सुरू होताच परिसर भक्तिमय होतो. रथाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी होते. अनेक भाविक या सोहळ्यात सहभागी होऊन रथ ओढण्याची सेवा करतात. श्रद्धा, उत्साह आणि सामूहिक सहभाग यामुळे पारोळ्याच्या रथोत्सवाला वेगळीच ओळख प्राप्त झाली आहे. रथाच्या मार्गक्रमणात मोगऱ्या धारण करणाऱ्या बारी बांधवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कृष्णा बारी, राजू बारी, संजय बारी, प्रकाश चौधरी यांच्यासह अन्य बारी बांधव रथाला योग्य दिशा देणे, रथ वळविणे आणि त्याचे मार्गक्रमण नियंत्रित करणे यांसारखी जिकिरीची कामे पार पाडतात. रथाचा प्रचंड आकार, वजन आणि रस्त्यांवरील भाविकांची गर्दी लक्षात घेता या सेवेकऱ्यांना विशेष कौशल्य, अनुभव आणि सावधगिरी बाळगावी लागते. त्यामुळे रथोत्सवाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन यामध्ये मोगऱ्या मंडळाचे योगदान मोलाचे ठरते.

यंदाच्या रथोत्सवात फुलांची आकर्षक सजावटही भाविकांचे लक्ष वेधून घेणार आहे. रथ सजावटीचा मान अमृत ग्रुपचे केशव लक्ष्मणसा क्षत्रिय यांना देण्यात आला आहे. तर शिर्डी येथील द्वारकामाई फ्लॉवर भांडारचे मालक राजू उईके यांनी रथाच्या सजावटीची जबाबदारी सांभाळली आहे. ऑस्ट्र शेवंती, किशन्ती मम, जरबेरा, ड्रायसेना, सनफ्लॉवर, जास्वंद आणि झेंडू यांसारख्या विविध फुलांचा वापर करून रथ सजविण्यात येत आहे. रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक रचनेमुळे रथाचे सौंदर्य अधिक खुलून दिसणार आहे. राजू उईके हे गेल्या पाच वर्षांपासून रथ सजावटीची सेवा देत आहेत. फुलांच्या सजावटीसोबतच यंदा रथावर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आकर्षक शार्पी लाईट्स आणि आधुनिक प्रकाशयोजनेमुळे रात्रीच्या वेळी रथाचे सौंदर्य अधिक खुलून दिसणार आहे. पारंपरिक कलाकुसर, धार्मिक श्रद्धा आणि आधुनिक रोषणाई यांचा संगम यंदाच्या रथोत्सवाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे.

रथोत्सवाच्या निमित्ताने श्री बालाजी महाराजांना केशदान करण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी यंदा बालाजी पार्क येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. केशदान करू इच्छिणाऱ्या भाविकांनी या व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी बालाजी पार्क येथे जावे, असे आवाहन श्री बालाजी महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. पारोळ्याचा रथोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. अनेक पिढ्यांपासून जपली गेलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पुढे नेली जात आहे. महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतून येणारे भाविक, रथ ओढणारे सेवेकरी, सजावट करणारे कारागीर आणि संस्थानचे कार्यकर्ते यांच्या सहभागातून या उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.


Protected Content

Play sound