जामनेर, प्रतिनिधी । तालुकास्तरीय ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती च्या सदस्यांची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेस 30 गावचे सरपंच व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. सेवानिवृत्त अभियंता जे. के.चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाव्दारे राबवण्यात येणाऱ्या या समितीद्वारे गावातील स्वच्छता, आरोग्य व स्वच्छ पाणी यांचा दर्जा सुधारण्यासाठी कामकाज करावे लागते. या समितीचे अध्यक्ष त्या गावचे सरपंच असतात व सचिव आशा स्वयंसेविका असतात. यापूर्वी अंगणवाडी सेविका ह्या या समितीच्या सचिव होत्या 30 जुन 2018च्या शासन निर्णयानुसार यामध्ये बदल होऊन आशा स्वयंसेविका यांची सचिव म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे. कार्यशाळेस 30 गावचे सरपंच व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. सेवानिवृत्त अभियंता जे. के.चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य एवं जिल्हा आरोग्य समिती सदस्य अमित देशमुख व पंचायत समिती जामनेर चे गटविकास अधिकारी अजय जोशी तर बाळू धुमाळ, युवराज पाटील,सुषमा पाटील, निटू ठाकूर, बाळू चव्हाण यांच्यासह 30 महसुली गावचे सरपंच उपस्थीत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी समितीचे महत्व नमूद केले व “शुद्ध पाणी, स्वच्छता, आरोग्य यामध्ये लोकसहभाग खुप महत्वाचा असून लोकसहभागातूनच याचा दर्जा सुधारू शकतो” असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात जे. के. चव्हाण यांनी उपस्थितांना आपले गाव हगणदारी मुक्त , शुद्ध पाणी पुरवठा करणारे व आरोग्यविषयी जनजागृती करणारे गाव व्हावे यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. बशीर पिंजारी यांनी मान्यवरांचे आभार मानले तर बी.सी.बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही. एच.माळी, रवींद्र सुर्यवंशी, विजय पवार, नरेंद्र तव्वर ,अनुराधा कल्याणकर, प्रदीप पाटील व सर्व गटप्रवर्तक यांचे विशेष सहकार्य लाभले.