भुसावळ प्रतिनिधी । वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले, जलदगतीचे वीज मीटर या तक्रारी ग्राहकांनी गेल्या 3 माहिन्यापासून केल्या आहेत. मात्र हा भोंगळ कारभार थांबत नसल्यामुळे ग्राहकांनी आज वीज वितरण कार्यालयात संताप व्यक्त करत ठिय्या मांडला आहे.
अति जलद फिरणाऱ्या जिनियस कंपनीच्या मीटर सोबत जुने वीज मीटर तपासा अशी मागणी केल्यावर महावितरणच्या भोंगळ कारभारावर अधिकारी बोलण्यास तयार नाही, कार्यक्षेत्रात हा विषय बसत नाही, असे उत्तर देताच वरिष्ठ अभियंते याविषयी बोलण्यास तयारी दर्शवतीलच तोपर्यंत ‘ग्राहकांनी वीज बिल भरू नये’, असे आवाहन प्रा. धिरज पाटील यांनी केले आहे. गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून येथील हजारो ग्राहकांना अव्वाच्या सव्वा रक्कमेची वीज बिले येत आहेत. अनेक ग्राहकांनी भरमसाठी वीज बिल येत असल्याबद्दल तक्रारीही केल्या. मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. काहींना तर ही बिले भरावीच लागली. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जुने मीटरच बसवून द्यावे, अश्या मागण्या ग्राहकांनी केल्या. संगणकीकरणाने काहीही फायदा झाला नसून, अजूनही मीटर रिडींग एजन्सीच रिडींग वाचन करून चुकीचे रिडींग देत आहे.
जळगाव रोड भागातील वेडी माता मंदिर परिसर, भुसावळ हायस्कूल, श्रीनगर, गणेश कॉलनी, भिरुड कॉलनी, खळवाडी, काशीराम नगर, अष्ट विनायक कॉलनी, हुडको कॉलनी, अयोध्या नगर, भोई नगर, मोहित नगर, जुना सातारा या परिसरातील ५००० ग्राहकांना एव्हरेज रिडींग पाठवले आहे. जिनियस कंपनीच्या आरएफचे वीज मीटर शहरात बसवले तर लक्षात ठेवा अशी ताकीद ग्राहकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. कारण जिल्हा नियोजन बैठकीत सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा सूचना दिलेल्या होत्या. परंतू शहरात नवीन वीज मीटर बसवणे, तूर्तास बंद केले आहे. असे जिनियस कंपनीच्या अधिकाऱ्याने कळवले आहे. तसेच यावेळी प्रा.धिरज पाटील, रमेश भोई, सुदाम सोनवणे, विशाल ठोके, हूना कोळी, राकेश खरारे, निखिल बऱ्हाटे, दिगंबर चौधरी, देविदास पाटील, किशोर धोटे व असंख्य ग्राहक उपस्थितीत होते. अतिरिक्त अभियंता व्ही.बी.पाटील यांनी जळगाव विभागाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्याशी चर्चा करून ग्राहकांचे धरणे सोडवले आहे.