सरकार करणार शकुंतला रेल्वेचे अधिग्रहण

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय रेल्वे ब्रिटिश कंपनी क्लिक-निक्सनने बांधलेल्या आणि स्वातंत्र्यानंतरही खासगी मालकीत राहिलेल्या शकुंतला रेल्वेचे अधिग्रहण करणार आहे. यामुळे देशातील ब्रिटिशकालीन खासगी रेल्वे नेटवर्कची अखेर होणार आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ आणि अचलपूरदरम्यान १९१६ मध्ये १८८ किमी लांबीचा हा नॅरोगेज ट्रॅक उभारण्यात आला होता. त्या काळात कापूस वाहतुकीसाठी याचा उपयोग होत असे. प्रवासी वाहतुकीसाठी चालवली जाणारी “शकुंतला एक्सप्रेस” हीच या रेल्वे नेटवर्कच्या नावाचा आधार बनली.

१९५२ मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण झाले असले तरी सेंट्रल प्रोव्हिन्सेस रेल्वे कंपनीच्या ताब्यात हा ट्रॅक राहिला. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यानंतरही हा ट्रॅक ब्रिटनच्या खाजगी कंपनीच्या मालकीचा राहिला, आणि भारतीय रेल्वेने त्यांच्या सोबत करार करत आजही रॉयल्टी देणे सुरू ठेवले आहे. २०१६ मध्ये १५,००० कोटी रुपये खर्चून हा ट्रॅक ब्रॉडगेजमध्ये बदलण्याची योजना आखली गेली. यासाठी जुलै २०१७ मध्ये यवतमाळ-मूर्तिजापूर आणि एप्रिल २०१९ मध्ये मूर्तिजापूर-अचलपूर विभागातील सेवा बंद करण्यात आली. आता हा ट्रॅक संपूर्णतः भारतीय रेल्वेच्या अखत्यारित येणार असून, ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित होणार आहे.

शकुंतला रेल्वे चालवण्यासाठी CPRC भारतीय रेल्वेकडून दरवर्षी २-३ कोटी रुपये रॉयल्टी घेते. मात्र, अधिग्रहणाआधी कंपनीने १२-१६ कोटी रुपयांच्या रॉयल्टीचा दावा केला आहे, जो ट्रॅक देखभाल व इतर बाबींमध्ये समायोजित केला जाऊ शकतो. हे अधिग्रहण आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक बदलासह भारताच्या रेल्वे नेटवर्कमधील एक अनोखा वारसा इतिहासजमा होणार आहे.

Protected Content