मुंबई प्रतिनिधी | केंद्र सरकारच्या समितीनेही तिसर्या लाटेचा इशारा दिला असल्याने राज्यातील सणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र आम्ही सणांच्या नव्हे तर कोरोनाच्या विरोधात असल्याचे आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आज आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांवर टीका केली.
प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आलं होतं. आज ठाणे शहरातील दुसर्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन या पध्दतीत करण्यात आलं. या कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि मनसेवर टीका केली. कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही, हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला.