चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव शहरातील जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शाळेचे सचिव, मुख्याध्यापक आणि क्लार्क यांनी शासनाच्या 97 लाख रुपये फसवणुकीचा कट रचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुका पंचायत समितीतील तालुका विस्तार अधिकारी विलास आनंदा भोई (वय 50, रा. उंटवाडी तिळकेनगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 0087/2025 नुसार सचिव अशोक खलाणे, मुख्याध्यापक अभिजीत खलाणे आणि क्लार्क ज्ञानेश्वर महाजन यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही खाजगी अनुदानित शिक्षण संस्था असून, संस्थेचे सर्व कामकाज सचिव, मुख्याध्यापक आणि क्लार्क हे पाहतात. या तिघांनी मिळून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी दिली. काही शिक्षकांकडून बळजबरीने संमती पत्रावर सह्या घेण्यात आल्या, तर काहींच्या संमतीशिवाय त्यांच्या पगारातून 2006 पासून डिसेंबर 2024 पर्यंत बेकायदेशीरपणे पैसे कपात करण्यात आले.
या संस्थेतील 15 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारातून शासन नियमांची पायमल्ली करून 97,01,100 रुपये (सत्यानो लाख एक हजार शंभर रुपये) कपात केल्याचे उघड झाले आहे. या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.