Home आरोग्य शासकीय रूग्णालयातील परिचारिका बेमुदत संपावर !

शासकीय रूग्णालयातील परिचारिका बेमुदत संपावर !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवार, १९ जुलै रोजी सकाळी ९ वाजल्यापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील सर्व परिचर्या संवर्गातील स्त्री-पुरुष कर्मचारी (सिस्टर, ब्रदर) बेमुदत संपावर जाणार आहेत. वरिष्ठ पातळीवर कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने संघटनेला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे.

शुक्रवारीही (१८ जुलै) अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्यासोबत परिचारिका संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांची चर्चा झाली. डॉ. ठाकूर यांनी रुग्णांचे हित लक्षात घेऊन संपावर न जाण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, तसेच रुग्णहित विचारात घेऊन जळगावातील परिचारिकांनी १५ व १६ जुलै रोजी आझाद मैदान, मुंबई येथे राज्यव्यापी धरणे व निदर्शने करूनही, १७ व १८ जुलै रोजी काळ्या फिती लावून आपले काम सुरू ठेवले होते.

मात्र, शासनाकडून आपल्या मागण्यांबाबत कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे अखेर संघटनेला आता बेमुदत काम बंद आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घ्यावा लागला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने ६ जून रोजी परिचारिकांच्या कंत्राटी भरतीचा शासन निर्णय काढला होता, ज्यास राज्यभरातून तीव्र विरोध झाल्याने तो रद्द करण्यात आला. राज्यात वाढत्या लोकसंख्येनुसार १०० टक्के पदनिर्मिती करणे आणि १०० टक्के पदोन्नतीसाठी संघटना शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र, शासनाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याने परिचारिका संवर्गात संताप व्यक्त केला जात आहे.

शनिवारपासून जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ३३२ कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना (शासन मान्य), शाखा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव, चे अध्यक्ष रुपाली पाटील, कार्याध्यक्ष नीता दुसाने, सचिव राजेश्वरी कोळी आणि खजिनदार अक्षय सपकाळे यांनी दिली. या संपामुळे रुग्णांच्या सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound