जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून, महिलांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आव्हाणे येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ३५८ महिला व श्रमिक बांधवांना शासनाच्या विविध योजनांमधून भांडे संचांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी महिलांना उद्योजकतेचा मंत्र दिला. तसेच, गावातील श्री विठ्ठल मंदिराच्या उभारणीत ग्रामस्थांनी दिलेल्या मौल्यवान योगदानाचे आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दाखवलेल्या सहकार्याचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.

गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन देताना, जिल्हा परिषद शाळेतील पाच खोल्यांचे काम तसेच बौद्ध विहाराचे काम पूर्णत्वास आल्याची माहिती त्यांनी दिली. आव्हाणे गाव ते फाटा या मार्गाचे काँक्रिटीकरण लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आव्हाणे ते ममराबाद या महत्त्वाच्या मार्गासाठी ५ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर झाला असून, चार किलोमीटर लांबीच्या या मार्गावर आठ मोठ्या मोऱ्या, लहान पूल व संपूर्ण काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हा रस्ता तालुक्यातील पहिला पूर्ण काँक्रिटीकरण शेतरस्ता ठरणार आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या दळणवळणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या या विकासकामामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
श्री विठ्ठल मंदिराच्या उभारणीत दिलेल्या योगदानाबद्दल तसेच विविध विकासकामांबद्दल ग्रामपंचायत, मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांकडून पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. संदीप पाटील (उपशिक्षक, जि.प.) यांनी केले, तर माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविकात गाव विकासासाठी करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. आभार माजी सरपंच छगन पाटील यांनी मानले.
यावेळी सरपंच भारती पाटील, भगवान पाटील, राकेश चौधरी, विशाल नन्नवरे, शिवसेना विभागप्रमुख किटून नाना चौधरी, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, माजी तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, उद्योजक धनलाल शेठ शिरसाट, प्रगतशील शेतकरी रवींद्रतात्या चौधरी, सावखेडा सरपंच जितेंद्र पाटील, शेतकी संघाचे विजय पाटील, उमेश चौधरी यांच्यासह ग्रामस्थ व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



