मुंबई प्रतिनिधी । भाजप व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
गत वर्षाच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरकार स्थापनेचा घोळ सुरू असतांनाच अचानक पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. हे सरकार अर्थात अल्पायुषी ठरले असले तरी यातील सस्पेन्सची आजही चर्चा होत असते. आजवर फडणवीस आणि पवार यांनी याबाबत भाष्य केले असले तरी सर्वात महत्वाची व्यक्ती अर्थात शपथ देणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप याबाबत मौन धारण केले होते. आज त्यांनी याबाबत पहिल्यांदा भाष्य केले आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली त्याला ५ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेणारे जन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या नावाने आज पुस्तक प्रकाशित करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सकाळी सकाळी शपथविधी उरकून घेतला त्यावरून आपल्यावर टीका झाली होती, त्याबद्दल आपणास काय वाटते असं विचारलं असता, ”जर कुणी रामप्रहराला शपथ घेतली असेल, तर तुम्ही त्यावर प्रहार कशाला करता, असा उलट सवाल केला. राज्य सरकारशी आपला कसलाही वाद नाही वा संघर्ष नाही” असे त्यांनी स्पष्ट केले.
तर, कंगना प्रकरणावरुन आपण राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे का ? या प्रश्नावर माझी नाराजी कुणाला दिसली का, तसे मी कुणाशी काही बोललो का ? असा प्रतिप्रश्न त्यांनी करून याला उत्तर देणे टाळले.