Home उद्योग विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शालेय सहलींसाठी मिळणार एसटीच्या नव्या बसेस 

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शालेय सहलींसाठी मिळणार एसटीच्या नव्या बसेस 

0
155

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यभरातील शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा सहलींचा आनंद अधिक संस्मरणीय ठरणार आहे. कारण परिवहन विभागाने शालेय सहलींसाठी एसटीच्या नव्या बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सुट्टी संपल्यानंतर शाळांमध्ये सहलींची लगबग सुरू होते, आणि विद्यार्थ्यांना स्वस्त, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने महत्त्वपूर्ण तयारी सुरू केली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना मिळणारी ‘५०% भाडे सवलत’ कायम ठेवत यंदा अत्याधुनिक आणि अधिक आरामदायी एसटी बसेस शालेय सहलींसाठी वापरण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळांच्या भेटीद्वारे विद्यार्थी अभ्यासक्रमाशी निगडित ज्ञान प्रत्यक्षात अनुभवतील, यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.

राज्यभरातील २५१ आगारांमधून दररोज ८०० ते १००० एसटी बसेस शाळा-महाविद्यालयांना सहलींसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. आगारप्रमुख आणि स्थानकप्रमुख हे स्वतः शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून सहलींचे आयोजन करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. एसटीच्या नव्या बसेसमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षितता, स्वच्छता आणि प्रवासातील आरामदायी सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत.

एसटी महामंडळाने मागील वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील विविध शाळा-महाविद्यालयांना तब्बल १९,६२४ बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. या माध्यमातून एसटीला प्रतिपूर्ती रक्कमेसह ९२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. यंदाही ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शालेय सहली हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव असतो. निसर्ग, इतिहास आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी अशा सहली महत्त्वपूर्ण ठरतात. राज्य सरकारची ‘स्वस्त आणि सुरक्षित प्रवास’ ही भूमिका कायम ठेवत एसटी बसची सेवा विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभ होणार आहे.


Protected Content

Play sound