मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रामध्ये एकीकडे सत्ता स्थापनेसाठी राजकीय वातावरण तापलेले असून राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेल्या पीडित शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आर्थिक मदत जाहीर केली आहे. खरीप पिकांसाठी ८००० रुपये प्रति हेक्टर (अडीच एकर) आणि बारामाही पिकांसाठी १८ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.
बारामाही पिकांमध्ये फळबागांसह विविध पिकांचा समावेश होतो. अवकाळी पावसामुळे या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सुरुवातीला पावसाने दडी मारली आणि नंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे जे काही पीक आलं होतं, ते सर्व गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. या मदतीसह नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं आहे. महाविद्यालये आणि शाळांमध्ये द्यावी लागणारी फी यामुळे माफ केली जाईल. जाहीर केलेली मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रशासनाला आदेशही देण्यात आले आहेत. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपाल कार्यभार सांभाळत आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांच्या निगराणीत शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचवली जाणार आहे. यापूर्वी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेऊन मदत जाहीर करण्याची मागणी केली होती.