मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अनुकूल वातावरण असून त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार आहे. तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवसात पावसाचे आगमन होणार आहे.
यावर्षी नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा दिवस आधी मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे देशातील पूर्वोत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांत काही भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस होतोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवस पावसाचे असणार असून यात कोकण किनारपट्टीवर पुढील चार दिवस मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे.