भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या भुसावळ ते पुणे एक्सप्रेसची स्वप्नपूर्ती होण्याची शक्यता असून रेल्वे राज्यमंत्र्यांनी याचे सूतोवाच केले आहे. अर्थात, आता ही एक्सप्रेस लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
भुसावळ, जळगावसह जिल्ह्यातून पुण्याला जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मार्गावर रेल्वे गाड्या उपलब्ध असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. यामुळे खासगी वाहतुकदारांच्या मनमानीपणामुळे प्रवाशी हतबल झाले आहेत. विशेष करून सणासुदीच्या काळांमध्ये लक्झरी बसचालक हे अव्वाच्या सव्वा दर आकारणी करत असल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसतो. यामुळे या मार्गावर एक्सप्रेस ट्रेन सुरू करावी अशी मागणी कधीपासूनच करण्यात येत आहे.
खरं तर, भुसावळ ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त असली तरी अनेकदा ती चालू-बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. तसेच ही रेल्वे गाडी कल्याण-पनवेल मार्गाने पुण्याला जाते. यामुळे मनमाड-दौंड मार्गाने पुण्याला जाणार्यांसाठी हुतात्मा एक्सप्रेस सोयीची नाही. या सर्व बाबींचा विचार करता दिवसातून दोनदा आणि हे अशक्य असेल तर किमान एक वेळेस भुसावळ ते पुणे आणि पुणे ते भुसावळ एक्सप्रेस सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी आहे. या संदर्भातील निवेदने प्रवाशी संघटनांच्या वतीने अनेकदा देण्यात आलेली आहेत. तथापि, याचा काहीही फायदा झालेला नाही. या पार्श्वभूमिवर, रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी या मागणीबाबत सकारात्मकता दाखविली आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील विकासकामांचे लोकार्पण रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते शनिवारी सायंकाळी करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना त्यांनी भुसावळ ते पुणे ही नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले. तथापि, ही रेल्वे गाडी फेर्याने म्हणजेच नंदुरबार, उधना, वसई मार्गाने पुण्याला जाईल अशी शक्यता आहे. यामुळे वेस्टर्न लाईनवर जाणार्या प्रवाशांना लाभ होणार असला तरी भुसावळहून थेट पुण्याला जाणार्यांना मोठा फेरा पडल्याने ते यातून जाणार नाहीत. यामुळे ही ट्रेन सुरू झाली तरी ती दौंड आणि मनमान मार्गाने जाणारी असावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भुसावळ ते पुणे मार्गावरील ट्रेन लवकरात लवकर सुरू करावी यासाठी आता जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी पाठपुरावा करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. याच प्रमाणे भुसावळ ते मुंबई अशी एक्सप्रेस रेल्वे सेवा देखील लवकर सुरू करण्यासाठी खासदारांनी पाठपुरावा करण्याची अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे.