जळगाव, प्रतिनिधी | जळगाव दुध संघाने आपले कार्यक्षेत्र वाढविल्यास यापेक्षा जास्त चांगले दिवस दुध संघास येतील. महिलांना डेअरीमध्ये मदत करून त्यांचा सहभाग वाढविल्यास दुध उत्पन्नात वाढ होईल असे प्रतिपादन आ. एकनाथराव खडसे यांनी केले. जळगाव जिल्हा दुध उत्पादक संघाची ४८ वी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी दुध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील, दुध संघाचे संचालक मंडळ उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, दुध उत्पादन हा शेतीचा दुय्यम पूरक उद्योग आहे. महिलांसाठी हा एक महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन असल्याने त्यांचा सहभाग वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच खास महिलांसाठी स्वतंत्र डेअरी असावी असे मत आ. खडसे यांनी व्यक्त केले. संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी सांगितले की, सन २०१८-१९ मध्ये दूध संघाने भौतिक व आर्थिक अशा दोन्ही क्षेत्रातील कामगीरी चांगली झाली आहे. आज मागील ४६ वर्षातील दैनिक दुध संकलनाचा उच्चांक गाठून ३ लाख २७ हजार लिटर्सच्या वर प्रतिदिन संकलन केले आहे. दुध संघाने ४९४ कोटी रकमेची वार्षिक उलाढाल घडवून नवीन उच्चांक प्रस्तापित केला आहे. २०१८-१९ मध्ये ३ कोटी ११ लाखांचा नफा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. लेखा परीक्षणात संघास अ वर्ग प्राप्त झाला आहे. बाजार पेठेत तीव्र स्पर्धा असतांना दुध विक्री झालेली आहे. सध्यस्थितीत जळगाव व मुंबई येथील विक्री प्रती दिन २ लाख ९६ हजारापर्यंत गेली आहे. पुणे येथे दुध विक्री, विकास आईसक्रिमचे विविध प्रकारचे उत्पादने, विटामिन ए व डी युक्त दुध बाजारात बाजारात विक्रीसाठी आणले आहे. विकास लस्सी विविध स्वादामध्ये उपलब्ध करून देणे व विकास सुगंधित व निर्जंतुक दुध विविध स्वदामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डेअरी मंडळाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.