जळगाव (प्रतिनिधी)। भुसावळकडून मुंबईकडे जाणाऱ्या काशी एक्सप्रेसमध्ये २७ मे रोजी एक पाच महिन्यांचे गोंडस बाळ आढळून आले होते. दरम्यान, ते बाळ आपलेच असल्याचा दावा नाशिक येथील व्यक्तीने केला होता. त्यानंतर कागदपत्रे व इतर माहितीच्या आधारे ते बाळ एका मनोरूग्ण महिलेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ती महिला अद्याप बेपत्ता आहे तर बाळाबाबत असलेली सर्व माहिती मिळल्यानंतर बाळाचे नाव सुरेश सैनी असल्याचे स्पष्ट झाले आहे. जयराम बोंदुराम सैनी (वय-३६) रा. पंचवटी, नाशिक असे बाळाच्या वडीलांचे नाव आहे.
थोडक्यात घटना अशी की,
२७ मे रोजी दुपारी १.३० वाजता काशी एक्सप्रेस भुसावळकडून मुंबईकडे जात असतांना एका बोगीत पाच महिन्यांचे बाळ बेवारस स्थितीत आढळून आल्याचे रेल्वे पोलिसांच्या लक्षात आले. बाळाचे आईवडील किंवा कुणीही नातेवाईक यांचा थांगपत्ता न लागल्याने अखेर रेल्वे पोलिसांनी त्याला रेल्वे जीआरपीच्या ताब्यात दिले. ही घटना घडल्यानंतर जीआरपी विभागाने जळगावात कार्यरत असलेल्या समतोल प्रकल्पाच्या सपना श्रीवास्तव यांच्याशी संपर्क करून बाळाबाबत माहिती दिली. त्यांनी बाळाला ताब्यात घेत वैद्यकिय तपासणी करून धुळे येथील शासकीय बालसुधारगृहात त्याला दाखल केले होते.
नाशिक येथेहरविल्याची नोंद
नाशिक येथे हातमजूरीचे काम करणारे जयराम सैनी पत्नी वनिता (वय-३२), मोठी मुलगी निर्मला (वय-४/५), लहान मुलगी साक्षी (वय-३) आणि पाच महिन्याचे बाळ सुरेश यांच्यासह राहतात. १९ मे रोजी सकाळी ८.०० वाजता जयराम सैनी हे कामाला निघून गेले. घरी पत्नी व तिनही मुले होती. त्याचदिवशी दुपारी १.३० वाजता शेजारी राहणाऱ्यांनी जयराम यांना कळविले की, तुमच्या दोन्ही मुली घराबाहेर एकट्याच खेळत आहेत. त्यानंतर ते घरी आल्यावर त्यांना पत्नी वनिता आणि बाळ सुरेश आढळून आले नाहीत. त्यांच्या नातेवाईकांकडे शोधाशोध करूनही त्या मिळून आल्या नाहीत. याबाबत जयराम सैनी यांच्या खबरीवरून नाशिक येथील पंचवटी पोलीस स्टेशनला पत्नी आणि बाळ हरविल्याची नोंद २१ मे रोजी रात्री ९.०० वाजता गु.र.नं. ७५/२०१९ प्रमाणे करण्यात आली होती.
२८ मे रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर बेवारस बाळ आढळून आल्याची बातमी सर्व वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली होती. त्या माहितीच्या आधारे जयराम सैनी यांनी धुळे येथील शासकीय शिशुगृहात जावून चौकशी केली व ते बाळ आपले असल्याचे सांगितले. सोबत त्यांनी आपल्या दोन्ही मुली, पोलीसात दाखल केलेली हरवल्याची नोंद, बाळाचा जन्म दाखला, बाळाचा लहानपणीचा फोटो आणि पत्नीचे मुलांसोबतचे सगळे फोटो दाखवले. त्यावरून हरवलेल्या बाळाचे वडील हे जयराम सैनी असल्याचे स्पष्ट झाले.
काशी एक्सप्रेसमध्ये सापडले सहा महिन्याचे गोंडस बाळ
तीन महिन्यानंतर ‘त्या’ बाळाला दत्तक दिले देणार – सपना श्रीवास्तव (व्हिडीओ)
बाळाची आई मनोरूग्ण
दरम्यान, बाळाची आई वनिता सैनी हिचे मानसिक संतुलन बिघाडल्याने हा प्रकार घडला असल्याचे जयराम सैनी यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांशी बोलतांना सांगितले. १९ मे ते २७ मेपर्यंत वनिता आणि बाळ सुरेश कुठे होते यांचा थांगपत्ता नव्हता. मानसिक बिघडल्याने ती दोन्ही मुलींना सोडून पाच महिन्याच्या बाळाला घेवून कोणालाही काहिही न सांगता निघून गेली होती. मात्र २७ मे रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर पाच महिन्याचे बाळ बेवारस स्थितीत आढळून आले, त्यावेळी त्याच्यासोबत कोणीच आढळून आले नव्हते. अखेर जिल्हा शासकीय रूग्णालयात बाळाची वैद्यकिय तपासणी करून त्याची धुळे येथील शिशुगृहात रवानगी करण्यात आली होती.
सहा वर्षांपर्यंत तीनही बालके शिशुगृहात
पत्नी मनोरूग्ण असल्याने घरात इतर कोणीही राहत नाही. जयराम सैनी यांची आई ही म्हातारी असल्याने राजस्थानातील गावाकडे राहते. जयराम हे कामानिमित्त नाशिक येथे उदरनिर्वाहासाठी गेल्या दोन वर्षांपासून आले होते. पत्नी आणि बाळ हरवल्यानंतर त्यांनी काम बंद ठेवले होते. धुळ्यात बाळ असल्याने ते दोन्ही मुलींनी घेवून धुळ्यात आले. शिशूगृहातील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दोन्ही मुली सहा वर्षाच्या आत असल्याने त्यांना शिशुगृहात ठेवण्याच्या सुचना जयराम यांना देण्यात आल्या. तसेच सदर बाळालाही सहा वर्षांचे हाईपर्यंत शिशूगृहात ठेण्यात येणार असल्याचे शिशुगृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे.