जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव: जागतिक मलेरिया दिनाचे औचित्य साधून गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे नशिराबाद येथे जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून ‘मलेरिया प्रतिबंधासाठी उपाय करा आणि हिवतापाला दूर करा’ असा महत्त्वपूर्ण संदेश देत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने जागतिक मलेरिया दिनानिमित्त नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या १०० विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीपर फलक घेऊन नशिराबादच्या विविध भागातून रॅली काढली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी मलेरिया आजाराची कारणे, लक्षणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांबाबत नागरिकांना माहिती दिली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांनाही मलेरिया आणि इतर आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना मलेरियामुक्त समाजासाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.
या जनजागृती कार्यक्रमात गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, उपप्राचार्य जेसिंथ दहिया, प्रा. निर्भय मोहोड, प्रा. स्वाती गाडेगोने, प्रा. अश्लेषा मून, प्रा. रितेश पडघान, प्रा. डिव्हायना पवार, प्राजक्ता आराक आणि सुमित भारंबे यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. रॅलीमध्ये महाविद्यालयाच्या बीएससी नर्सिंगच्या पाचव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे आणि जनजागृतीपर संदेशामुळे नशिराबादमधील नागरिकांमध्ये मलेरिया प्रतिबंधाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला.