जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग २०२६ या क्रिकेट स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात भव्य प्रारंभ झाला. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला विविध शैक्षणिक संस्थांच्या संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून क्रीडाप्रेमींसाठी हा सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
गोदावरी फाउंडेशन संचलित या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अनिल पाटील, तसेच के. जी. सोमय्या कॉलेज मुंबई येथील डॉ. शरद कोलते यांच्यासह डॉ. वैभव पाटील, डॉ. प्रशांत वारके, डॉ. विजय पाटील, नीलिमा चौधरी आणि डॉ. नीलिमा वारके यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा संस्कृतीच्या जतनासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.

१३ आणि १४ फेब्रुवारी रोजी आयोजित या स्पर्धेत एकूण सात संघांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा, गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल जळगाव, गोदावरी अॅग्रीकल्चर कॉलेज, गोदावरी लॉ कॉलेज, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि डॉ. वर्षा पाटील बीसीए या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत गोदावरी फाउंडेशनच्या कर्मचारी आणि शिक्षकवर्गानेही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदासाठी आपला मजबूत दावा सादर केला. खेळाडूंनी दाखविलेल्या कौशल्यामुळे सामने अत्यंत रंगतदार झाले असून प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
या स्पर्धेचे आयोजन गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल जळगाव आणि गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यांनी संयुक्तपणे केले आहे. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.



