Home क्राईम धरणगावात घरासमोरून बकरा चोरीला ; वकिलाची पोलिसांत तक्रार 

धरणगावात घरासमोरून बकरा चोरीला ; वकिलाची पोलिसांत तक्रार 

0
103

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील भडंगपुरा परिसरात घरासमोर बांधून ठेवलेला पाळीव बकरा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्थानिक वकील आसिफ अली वाजीद अली कादरी यांनी धरणगाव पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदार आसिफ कादरी हे भडंगपुरा, धरणगाव येथील रहिवासी असून वकिली व्यवसाय करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा १४ महिन्यांचा चॉकलेटी रंगाचा, पांढऱ्या डागांचा चीत कबरा जातीचा बकरा दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ ते २ वाजण्याच्या सुमारास घरासमोर दरवाज्यात बांधलेला होता. त्याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने सदर बकरा चोरून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

चोरीची घटना लक्षात येताच कादरी यांनी आपल्या कुटुंबीयांसह नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली. शेजारच्या गल्लीबोळांमध्ये जाऊन चौकशी करण्यात आली तसेच बकऱ्याचा फोटो दाखवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अद्यापपर्यंत बकऱ्याचा कोणताही मागमूस लागलेला नाही. बाजारभावानुसार या बकऱ्याची किंमत सुमारे १२ हजार रुपये असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे.

कादरी यांनी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र “दिवसा घराबाहेरून चोरी कशी होऊ शकते” असे सांगत पोलिसांनी तपास करू असे सांगून तक्रार घेण्यासाठी वेळ मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांकडून औपचारिक तक्रार नोंदवली गेल्याशिवाय तपासाला वेग येणार नाही, याची जाणीव असल्याने त्यांनी ११ फेब्रुवारी रोजी लेखी स्वरूपात तक्रार सादर केली आहे.

हा बकरा कुटुंबाने लहानपणापासून पाळलेला असून तो कुटुंबातील सदस्याप्रमाणे असल्याचे कादरी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे ही केवळ आर्थिक हानी नसून भावनिक धक्का असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून सखोल तपास करण्यात यावा व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून दिवसा घरासमोरून पाळीव प्राणी चोरीला जाण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound