नवी दिल्ली वृत्तसंस्था । अंडे आणि कोंबडी यांना ‘शाकाहारी’ हा दर्जा देण्याची अजब मागणी करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमाल उडवून दिली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी राज्यसभेत एक नवीन मुद्दा उपस्थित करत कोंबडी आणि कोंबडीचे अंडे यांना ‘शाकाहारी’चा दर्जा देण्याची मागणी केली आहे. यासाठी राऊत यांनी नंदुरबार जिल्ह्यात त्यांना आलेल्या अनुभवाचा दाखला दिला. ते म्हणाले की, नंदुरबारातील आदिवासी बांधवांनी मला जेवणाचं ताट आणून दिलं. मी त्याला विचारलं काय आहे जेवणात? तर तो म्हटला ही कोंबडी आहे. मी म्हटलं मला कोंबडी नको, तर तो म्हटला ही आयुर्वेदीक कोंबडी आहे जी तुम्ही खाल्लीत तर तुमच्या शरीरात जर काही आजार असतील तर ते बरे होऊ शकतात. आम्ही या कोंबडीचे पालनपोषणच अशा रितीने करतो की ती आयुर्वेदीक कोंबडी म्हणूनच वाढवली आहे. याचा दाखला देऊन कोंबडी आणि कोंबडीचे अंडे यांना ‘शाकाहारी’ हा दर्जा देण्याची गरज असून आयुष मंत्रालयाने याची दखल घेतली पाहिजे अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.