भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषदेतील कोरोना काळात उपायांची कर्तव्य करतांना दगावलेल्या न.प. कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा कवच व सानुग्रह सहाय्याची योजना लागू करण्यात यावी, त्यासाठी स्वतंत्र ठराव न.प. सभेत मंजूर व्हावा, अशी मागणी भाजपाचे वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ. नि.तू.पाटील यांनी केली आहे.
भुसावळ नगरपरिषेदतील दोन कर्मचारी कोरोना काळात उपायांची कामे करतांना दगावले होते. त्यांच्या वारसांना राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्रत्येकी ५० लाखांचे सानुग्रह अनुदान देणे शक्य नसले तरी नगरपरिषदेने स्वतंत्र तरतूद करून दोघांच्या वारसांना किमान प्रत्येकी २१ लाख रूपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी डॉ. नि.तू.पाटील यांनी केली आहे. या बद्दल ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना असा ठराव मंजूर करतांना विरोधक टिका करतील अशी भिती वाटत असेल तर तो ठराव खुलेपणाने मतदानासाठी ठेवावा त्यातून भुसावळ शहरातील जनतेलाही कळेल. सत्ताधारी असोत की विरोधक ते आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी किती संवेदनशिल आहेत. राज्य सरकारच्या सध्याच्या नियमानुसार नगरपरिषदांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अश्या मदतीची तरतूद नसल्याचे स्पष्ट झाल्यावर डॉ. नि.तू.पाटील यांनी विशेष बाब म्हणून नगरपरिषदेने पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे.