५० कोटी रुपये द्या, मोदींची हत्या करतो ; तेज बहादूर यांचा व्हिडिओ व्हायरल

tejbahadur modi

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बीएसएफमधून निलंबित करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांचा एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. मला 50 कोटी द्या. मोदींना ठार करतो, असे तेजबहादूर यादव यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, हा व्हिडीओ खरा आहे किंवा खोटा हे समोर आलेले नाही. तर हा व्हिडीओ म्हणजे माझ्या विरोधात रचण्यात आलेला कट असल्याचे तेजबहादूर यादव यांनी म्हटले आहे.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून समाजवादी पक्षातर्फे रिंगणात उतरलेले सीमा सुरक्षा दलाचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी १ मे रोजी फेटाळला होता. याविरोधात तेजबहादूर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असतानाच सोमवारी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तेजबहादूर हे एका व्यक्तीशी गप्पा मारताना दिसत आहे. “मला पैसे द्या, मी मोदींची हत्या करण्यास तयार आहे. मला ५० कोटी रुपये द्या”, असे तेजबहादूर यादव बोलताना दिसत आहेत. यावर समोरील व्यक्तीने “मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि फक्त पाकिस्तानसारखे शत्रूराष्ट्रच मोदींच्या हत्येसाठी ५० कोटी रुपयांची सुपारी देतील”, असे सांगितले. यावर तेजबहादूर यांनी सांगितले की, मी देशाशी गद्दारी करणार नाही. मी असे कोणतेही कृत्य करणार नाही. मला एखाद्या भारतीय व्यक्तीने पैसे दिल्यावरच मी हत्या करण्यासाठी तयार आहे,असे म्हटले आहे.

 

 

दुसरीकडे यावरुन भाजपाने तेजबहादूर यांच्यावर सडकून टीका केली. ‘समाजवादी पार्टीनं उमेदवारी दिलेल्या तेजबहादूर यादव यांचा व्हिडीओ पाहून आम्हाला धक्का बसला. सपाने त्यांना वाराणसीतून उमेदवारी दिली. मात्र काही कारणांमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. आता ते 50 कोटींसाठी मोदींच्या हत्येचा कट रचताना टीव्हीवर दिसत आहेत,’ अशा शब्दांत भाजपाचे खासदार जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

 

 

दरम्यान, तेजबहादूर यादव यांनी त्या व्हिडीओत आपणच असल्याचे यादव यांनी मान्य केले आहे. मात्र हे आपल्या विरोधात रचण्यात आलेले कारस्थान असल्याचा दावा त्यांनी केलाय.“संबंधित व्हिडिओ हा २०१७ मधील आहे. दिल्ली पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलने हा व्हिडिओ शूट केला होता. व्हिडिओ शुटिंग केल्याचे मला माहित नव्हते. संबंधित कॉन्स्टेबलने व्हिडिओशी छेडछाड करुन ते व्हायरल केले”, असे तेजबहादूर यांनी म्हटले आहे. मात्र, त्यावेळी नेमकी चर्चा काय झाली होती,याचा तपशील त्यांनी सांगितलेला नाही. गेल्या आठवड्यात त्या कॉन्स्टेबलने माझ्याशी संपर्क साधला होता. ३० लाख रुपये दिले नाही तर त्याने हे खोटे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती, असा आरोप तेजबहादूर यांनी केला. तेजबहादूर यांच्या दाव्यामुळे हा व्हिडिओ खरा की खोटा, हा संभ्रम कायम आहे.

Add Comment

Protected Content