रावेर, प्रतिनिधी | परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी असी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना केली.
परतीच्या पावसाने ज्वारीला कोंब फुटल्याने ज्वारीचे पूर्ण पिक नष्ट झाले आहे. चारा, मका पिक खराब झाला आहे. सतत पाऊस असल्याने कापसाला लाग कमी होता त्यातच सतत पावसामुळे कापशीच्या कैऱ्या सडल्या, जो कापूस वेचणीचा होता तो गळून खराब झाला आहे. जो कापूस घरात आला आहे त्याला देखील भाव मिळणार नाही. कापसाचे उत्पन्न कमी झाल्याने शेतकऱ्यांनी जो खर्च शेतीसाठी लावला होता तो देखील त्यांना मिळणार नाही. यातच शासनाने पंचनामा करण्याचे धोरण पुढे केले आहे. यात पंचनामे पाहिजे त्या पद्धतीने होत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. यात अधिकाऱ्यांना कापसीचे पिक हिरवे दिसत असल्याने ते कापसीचा पंचनामा करत नाही. परंतु, कापसी हिरवीगार दिसत असली तरी तिचे बोंड खराब झाले आहेत. शासनाने कोणतेही पंचनामे न करता सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी असी मागणी पाटील यांनी केली आहे. ज्येष्ठ पत्रकार देवलाल पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्याच्या हात तोंडाशी आलेला घास यापूर्वी कधी पावसाने हिरावून घेतला नव्हता. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने तो हिरावून घेतला आहे. शासनातर्फे केवळ ज्वारी, मका या पिकांचे पंचनामे केली जात आहेत. कापसीचे पंचनामे शासनाने करावेत अशी अपेक्षा व्यक्त करत पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देवलाल पाटील यांनी केली आहे. शेतकरी रफिक शेख यांनी अवकाळी पावसाने त्यांचे जवळ जवळ ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. त्यांच्यावर कर्ज झाले असून हे फेडण्यासाठी सरकारने मदत द्यावी असी मागणी केली आहे.