Home Cities जळगाव गिरणा धरण भरण्याच्या मार्गावर : नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

गिरणा धरण भरण्याच्या मार्गावर : नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
74

जळगाव प्रतिनिधी | गिरणा धरण ९० टक्के भरले असून यातून लवकरच पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने नदीकाठावर राहणार्‍यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, गिरणा नदीवरील गिरणा धरण आज सकाळी ११ वाजेपर्यंत ९० टक्के भरले आहे. तसेच धरण क्षेत्रात पुराचे पाणी वेगाने येत असल्याने धरण भरण्याची शक्यता लक्षात घेऊन आज दुपारनंतर गिरणा धरणातून २५ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अग्रवाल यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. गिरणा नदीच्या उगम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे आज सकाळी ११ वाजेपर्यंत गिरणा धरण ९० टक्यांपर्यंत भरले आहे. धरण क्षेत्रात पूर पाण्याचा येवा पाहता आज दुपारपर्यंत धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा धरणातून आज दुपारनंतर २५ ते ३० हजार क्यूसेक्स या वेगाने पाणी गिरणा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, यासोबत मन्याड धरणातूनही गिरणा नदीत १९ हजार क्यूसेक्स या वेगाने पाणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा नदी काठावरील गावातील रहिवाशांनी सतर्कता बाळगावी. नागरिकांनी नदीत जावू नये, तसेच जनावरे नदीजवळ जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्यासह कार्यकारी अभियंता श्री. अग्रवाल, उपविभागीय अभियंता हेमंत पाटील, शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी केले आहे.


Protected Content

Play sound