नागपूर (वृत्तसंस्था) येथील कळमेश्वर परिसरातील शेतात एका पाच वर्षीय बालिकेवर अत्याचारानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, पोलिसांनी वेगाने तपास करून संजय पुरी नामक ३२ वर्षांच्या नराधमाला अटक केली आहे.
येथील कळमेश्वर परिसरातील शेतात एका पाच वर्षीय चिमुरडीचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळून आला. या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या बालवाडीत शिकणारी ही मुलगी गुरुवारपासून बेपत्ता होती. तेव्हापासून पोलिसांकडून या मुलीचा शोध सुरु होता. अखेर पोलिसांना काल सकाळी ११ वाजता लिंगा परिसरातील शेतात या मुलीचा मृतेदह आढळून आला. तिच्या तोंडात कापड व काड्या कोंबण्यात आल्या होत्या. तसेच दगडाने ठेचण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. गावकऱ्यांनी घटनास्थळी जमा होत पोलिसांविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या.