जळगाव (प्रतिनिधी) हतनूर (वरणगाव) ता. भुसावळ येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 ची स्थापन करण्यास काल मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या प्रेसनोटमध्ये ना. महाजन यांच्या प्रयत्नांनी ही मंजुरी मिळाल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे खडसे समर्थकांनी २० वर्षापूर्वी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे झालेल्या भूमिपूजनाचे फोटो व्हायरल करत सोशल मिडीयावर ‘आयत्या बिळावर नागोबा’ हा हॅशटॅग वापरून ना. महाजन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यामुळे अंतुर्ली व नायगांव विद्युत वाहिनीनंतर पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मंजुरीच्या श्रेयवादावरून पालकमंत्री ना. महाजन आणि माजी मंत्री खडसे यांच्यात जुंपल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या संदर्भात अधिक असे की, पोलीस प्रशिक्षण केंद्र, हतनूर (वरणगाव) ता. भुसावळ येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 ची स्थापन करण्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याकरीता 1384 पदांची निर्मिती करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. तसेच राज्य राखीव पोलीस बल गट निर्मितीसाठी अपेक्षित असलेल्या सुमारे एकूण 56.61 कोटी आवर्ती व 81.01 कोटी अनावर्ती खर्च मंजूर करण्यासही राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. प्रशासनाकडून आलेल्या प्रेसनोटमध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या प्रयत्नाने पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे स्थानिक प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्याच्या थोड्याच वेळात खडसे समर्थक माजी नगरसेवक तथा भाजपचे माजी शहरप्रमुख अशोक लाडवंजारी यांनी सोशल मीडियात एकनाथ खडसे यांच्या पाठपुराव्याुळेच राखीव पोलीस बल गट स्थापना; मंजुरी 20 वर्षांपूर्वीच मिळाली होती, निधीसाठी खडसे यांचा पाठपुरावा सुरू होता. या आशयाचा संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल केला.
लाडवंजारी यांनी सोशल मीडियात व्हायरल केलेला संदेश
एकनाथ खडसे यांच्या पाठपुराव्याुळेच राखीव पोलीस बल गट स्थापना; मंजुरी 20 वर्षांपूर्वीच मिळाली होती, निधीसाठी खडसे यांचा पाठपुरावा सुरू होता; 7 डिसेंबर 1998 रोजी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते झाले होते कोनाशिला अनावरण!
खडसे यांच्या पाठपुराव्याने, तत्कालीन गृहमंत्री लोकनेते स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांनी मंजुरी देऊन दि.7 डिसेंबर 1997 रोजी वरणगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे भुमिपुजनही केले होते. त्यावेळी वरणगाव हे आ. खडसे यांच्या मतदार संघात होते, तत्कालीन मंत्री असलेल्या खडसेंनी या प्रकल्पासाठी शासनाला जमीन उपलब्ध करुन दिली होती.
(वर 1998 मधील कार्यक्रमाची छायाचित्रे)
#आयत्याबिळावरनागोबा
पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मंजुरीच्या श्रेयवादावरून ना.गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यात एकप्रकारे जुंपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, खडसे समर्थकांच्या टीकेला ना. महाजन यांच्या समर्थकांकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. भविष्यात मात्र, ना. महाजन व खडसे यांच्यात या विषयावरून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंतुर्ली व नायगांव विद्युत वाहिनीच्या कामावरूनही वाद
मुक्ताईनगर तालुक्यात १३२ केव्ही विद्युत केंद्रातून ३३ केव्ही अंतुर्ली व ३३ केव्ही नायगांव या दोन उपकेंद्रांना जाणाऱ्या वाहिनीला ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांनी नुकतीच मंजुरी दिली होती. हे कामही गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाल्याची प्रसिद्धी झाली होती. त्यावेळी देखील खडसे समर्थक अंतुर्लीचे सरपंच ताहेर खान पठाण यांनी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचा गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. या वाहिनी मंजुरीचे श्रेय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी पं.स. सदस्य किशोर चौधरी घेत असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्याने ते सुद्धा राष्ट्रवादीला राम-राम ठोकून भाजपच्या आगामी मेगा भरतीत सहभागी होतात की काय ? असा प्रश्न विचारला होता.