धुळे प्रतिनिधी । जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीत नव्हे तर धुळे लोकसभा मतदारसंघातून मतपत्रीकेवर निवडणूक लढवावी असे खुले आव्हान आमदार अनिल गोटे यांनी त्यांना दिले आहे.
निवडणुकीआधी भाजपमधील भाऊबंदकी उफाळून आली आहे. आधीच धुळे महापालिकेत पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी उघडपणे पक्षाला आव्हान दिले. येथे भाजपने दणदणीत विजय संपादन केला तरी गोटे यांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी ना. महाजन खुले आव्हान करताना म्हटले की, बारामतीत निवडणूक लढवायला कशाला जाता. त्यापेक्षा धुळ्यातच निवडणूक लढवा. मात्र ही निवडणूक ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेवर निवडणूक लढवून दाखवा. धुळे शहरात भाजपचे ५० नगरसेवक आहेत. पाच जण समर्थक आहेत. भाजपचीच बी टीम असलेल्या एमआयएमकडून मालेगावमध्ये पाठिंबा मिळेल. लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभूत झालेले अमरिश पटेल तुम्हाला मदत करतील. एकदा तुम्ही धुळे लोकसभा मतदारसंघात याच. मगच तुम्हाला खरी निवडणूक काय असते ते दिसेल, असा टोलादेखील गोटे यांनी लगावला आहे.
दरम्यान, आमदार गोटे पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वेक्षणानुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन वर्षात तीन हजार वेळा खोटे बोलले आहेत. या यादीत महाजनांच्या नावाचा समावेश असता तर ट्रम्पऐवजी त्यांना सर्वात मोठा खोटारडा हा किताब मिळाला असता. आमदार गोटे यांची ही टीका भाजपला जिव्हारी लागण्याची शक्यता असून यावरून आता राजकीय वर्तुळातील वातावरण तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.