मुंबई प्रतिनिधी । संस्थेच्या दोन गटांमधील वादात आपल्याला नाहक ओढून सूड बुध्दीने गुन्हा दाखल करण्यात आला असून अॅड. विजय पाटील यांचा ‘बोलविता धनी’ कोण हे जळगावकरांना माहिती असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केले. या प्रकरणावरून आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. महाजन यांनी आपल्यावरील आरोपांचा साफ इन्कार करून पोलिसांनी तटस्थपणे चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली.
कोथरूड येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सायंकाळी आ. गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर सूडापोटी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा केला. ते म्हणाले की, मराठा विद्या प्रसारक संस्था जळगाव जिल्ह्यातील मोठी संस्था आहे. या संस्थेत दोन गट आहेत. या दोन्ही गटात खूप टोकाचे वाद आणि भानगडी आहेत. या सर्व भानगडीत अॅड. विजय पाटील जेलवारी करुन आले आहेत. त्यांचे मुलं, कुटुंबातील इतर सदस्यही जेलमध्ये जाऊन आले आहेत. आमचा त्या संस्थेशी काहीच संबंध नाही. कुठलाही संबंध नसताना आम्हाला संस्था ताब्यात घ्यायची आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. खरंतर हा गंभीर आरोप नाही तर हास्यास्पद आरोप असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
आ. महाजन पुढे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याची त्यांनी आता तक्रार केली. हा गुन्हा पुण्यात घडला. मात्र, याप्रकरणी त्यांनी तक्रार मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर निंभोरा पोलीस स्टेशनला केली. तिथून ते झिरो नंबरने पुण्याला आले. मी पोलीस अधिकार्यांना विचारलं, त्यांनी आत्मीयता दाखवली. साहेब आमच्यावर प्रेशर आहे. काय करायचं अशाप्रकारची तक्रार आहे, त्यावर मी गुन्हा नोंद करायला सांगितला, असं महाजन यांनी सांगितलं.
अतिशय बनवाबनवी चालली आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम सरकारकडून सुरु आहे. अॅड. पाटलांचा बोलाचा धनी कोण ते सर्व जळगावकरांना माहिती आहे. जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्दीष्टाने माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी तत्काळ त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी विनंती मी याचिकेत केली आहे. उच्च न्यायालयावने याबाबत पोलिसांना आदेश दिले आहेत, असं महाजन यांनी सांगितलं. आपल्यावर केलेल्या आरोपांपैकी एक टक्का जरी गोष्ट खरी असेल तर मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे. ही घटना शंभर टक्के खोटी आहे. महाराष्ट्र पोलिसांनी याची चौकशी करावी. हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने याविषयी जास्त बोलणार नाही. खोटे गुन्हे दाखल करुन काही साध्य होणार नाही, असंदेखील ते म्हणाले.