जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आमोदा खुर्द येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घर फोडून घरातून चांदीच्या वस्तू व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत तालुका पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, गणेश सोमा सपकाळे रा. आमोदे खुर्द ता. जळगाव यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 11 ऑगस्ट रोजी बंद घरातून 5 हजार रूपये रोख, 500 रूपये किंमतीचा मोबाईल आणि घरासमोरील अनिता सपकाळे यांच्या घरातील चार भार चांदीचे बेले चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गणेश सपकाळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होत. पोलीसांनी मोबाईलच्या सिम लोकेशनवरून चोरटा अडावद परीसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक पोलीसांची मदत घेवून संशयित आरोपी प्रकाश गारसिंग बारेला रा. निशाने पाणी जि. बडवाणी म.प्र. याला ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातील चोरलेला मोबाईल हस्तगत केला आहे. दरम्यान दोन्ही घरांची चोरी केल्याची कबुली देखील दिली आहे. याप्रकरणी त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सतिश हळनारे, वासुदेव मराठे, सुधीर पाटील, प्रितम पाटील, विजय दुसाने, प्रफुल्ल धांडे यांनी कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले.