जळगाव प्रतिनिधी | शहरातील आदर्श नगरातील धान्य व्यापारीच्या घरी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 1 लाख रुपये रोख आणि 6 तोळे सोने लंपास केल्याची घटना झाली असून रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहन यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
या बाबत माहिती अशी की, रितेश अंशीराम मंधान वय 35 रा. प्लॉट 5, दुर्वांकुर अपार्टमेंट, प्लॅट क्रमांक 11, गणपती नगर हे आपल्या पत्नी अनिता आणि मुलगा देवेश सह राहतात. रितेश यांचे दाणा बाजारात कृष्णा ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. आज दुपारी 2.15 वाजता घराला कुलूप लावून पत्नी अनिता ह्या रितेश यांना जेवणाचा डबा द्यायला गेल्या होत्या. त्यानंतर त्या बाजारात खरेदी करण्यासाठी निघून गेल्या. जेवण झाल्यानंतर रितेश घरी दुपारी 3.30 वाजता घरी आले. त्यांनी त्यांच्याजवळील एका चावीने दरवाजा उघडला. आत पाहिले असता अज्ञात चोरट्यांनी दोन बेडमधील फर्निचर कपटातून कपड्यांचे सामान अस्तव्यस्त करून एक लाख रूपये रोख आणि सहा तोळे सोने असे एकूण 2 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
डीवायएसपी निलाभ रोहन यांची पाहणी
मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून अज्ञात चोरट्यांनी दोन बेडरूममधील फर्निचर कपाटातून सर्व सामान अस्तव्यस्त करून रोकड लंपास करत पुन्हा घराला जसेच्या तसे कुलूप लावून पसार झाले आहे. या घटनेची माहिती रितेश यांनी रामानंद नगर पोलीसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. दिवसा झालेल्या घरफोडीची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम, रामानंद नगर पोलीस निरीक्षक दिलीप बुधवंत यांच्यासह आदीनी घटनास्थळी जावून पाहणी केली.
फिंगर प्रिंट आणि श्वान पथकाचे पाचारण
दरम्यान दुपारी 2.15 ते 3.30 या कलावधीत अज्ञात चोरट्यांनी मोठ्या शिताफीने घराचा दरवाजाचे आतून असलेले कुलूप उघडून रोकड लंपास केली होती. विशेष म्हणजे मुख्य दरवाजाला कोणत्याही प्रकारचे निशाण किंवा नुकसान न करता चोरी केली आहे. याबाबत पोलीस प्रशासनासमोर चोरी करणारा घरातील किंवा आजूबाजू राहणारे एखादा संपर्कातील व्यक्ती असावा असा संशय आहे. त्यामुळे पोलीसांनी श्वान पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. तर दोन फिंगर प्रिंन्ट एक्सपर्ट यांनी देखील दोन्ही खोलीतील अस्तवस्था झालेल्या सामानाची तपासणी करून ठसे घेण्याचे काम सुरू होते. अपार्टमेंटमध्ये खाली राहत असलेला वॉचमन प्रल्हाद तुळशीराम पवार हा आपल्या परीवारासह राहतो. दिवसा घरफोडी झाली त्यावेळी वॉचमन देखील घरी होता. त्याची देखील चौकशी पोलीसांनी केली आहे.
दरम्यान रितेश यांच्याकडे मुख्य दरवाजाच्या कुलूपाच्या एकूण चार चावी आहेत. रितेशकडे एक चावी, पत्नी अनिताकडे दुसरी, तिसरी त्यांच्या आईवडीलांकडे आणि चौथी चावी ही त्याच अपार्टमेंटमधील समोरील शेजारी राहणार ओरियन्ट सिमेंटमध्ये दत्ता पांडे यांच्या कुटुंबियांकडे होती. ज्यावेळी ही चोरी झाली त्यावेळी पांडे यांचे कुटुंबिय घरात कुलर लावून झोपले होते. मात्र चौथी चावी पांडे कुटुंबियांकडे राहत असल्यामुळे पोलीसांची संशयांची सुई त्यांच्याकडे गेली. त्यामुळे विभागीय पोलीस अधिकारी रोहन यांनी पांडे यांच्या घराची देखील झडती घेण्यात आली.