श्रीनगर मिळवणे दूरच पण मुझफ्फराबाद वाचवणेही कठीण – भुट्टो

images 6

इस्लामाबाद, वृत्तसंस्था | काश्मीर प्रश्नावरून जगभरात नाचक्की झाल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांना आता पाकिस्तानातही टीकेला सामोरे जावे लागत आहे. ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी इम्रान खान यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोदींनी काश्मीर हिसकावला आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अजून झोपलेलेच आहेत. श्रीनगर कसे मिळवायचे हे आपले धोरण होते, परंतु, आता मुझफ्फराबाद वाचवणेही कठीण झाले आहे, अशा शब्दांत भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर टीका केली आहे.

 

पाकिस्तानच्या सरकारला सर्वच बाबतीत अपयश आले आहे. इम्रान खान नरेंद्र मोदी यांच्यासमोर काहीच बोलू शकत नाही. ते आता मांजर बनले आहेत. इम्रान खान यांना पाकिस्तानच्या जनतेने निवडून दिलेले नाही तर त्यांना काही लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी पंतप्रधानपदी बसवले आहे. नेतृत्त्व करण्यात इम्रान खानला पूर्णपणे अपयश आले आहे. ते विरोधकांच्या निर्णयामागे चालतात, असा आरोपही भुट्टो यांनी केला. इम्रान खान यांनी आपले नेतृत्त्वगुण दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. पाकिस्तानमधील जनता महागाईच्या त्सुनामीत वाहून जात आहे. आता तर काश्मीरही हातातून गेला आहे, असेही भुट्टो म्हणाले.

भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात काश्मीरचा मुद्दा होता. जर हे इम्रान खान यांना माहिती होते तर मग त्यांनी जनतेला का नाही सांगितले ?, केवळ आपल्या फायद्यासाठी जेव्हा राजकारण केले जाते त्यावेळी असेच होते, असा आरोपही भुट्टो यांनी केला. जर मला अटक करायची असेल तर खुशाल करावी. मोदींना अन्य देशात सन्मान मिळत असल्याने तुम्ही आता रडत बसला आहात. तुम्ही आधी जगभरात का फिरला नाहीत. आधी तयारी का केली नाही. हे सर्व पाकिस्तानी परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे, असा आरोपही भुट्टो यांनी केला आहे.

Protected Content