पाचोरा प्रतिनिधी । शहरातील जामनेर रोडवरील कन्या शाळेजवळील राजमाता जिजाऊँ व्यापारी संकुलातील गाळा नं. १३ गायत्री स्वीट मार्ट या दुकानाला आज (दि.14 जून) रोजी पहाटे अचानक आग लागली. दरम्यान दुकानाला आग लागण्याचे कारण अद्याप ही स्पष्ट झालेले नाही आहे.
याबाबत माहिती अशी की, गायत्री स्वीट मार्ट या दुकानाला आज दि. १४ जून रोजी सकाळी ३ ते ४ वाजेच्या सुमारास बंद दुकानास आग लागली. या आगीत अंदाजे ३ ते ४ लाखांचे पान मसाला तसेच दुकानातील फर्नीचर जळुन खाक झाले आहे. दुकानासमोरील रहिवाशी बाजोरीया हे सकाळी उठले असतांना त्यांनी हे दृश्य बघताच, त्यांनी समोरील संकुलातील गाळा नं.१३ मधुन धुर निघत असल्याचे पाहुन त्यांनी तात्काळ नगरपालिका व पाचोरा पोलिस स्टेशनला तसेच दुकान मालक गोपाल अग्रवाल यांना तात्काळ फोन केला. या दरम्यान अग्नीशमनदलाला पाचारण करण्यात आले. बंद दुकानाचे शर्टर उघडताच आग विझवण्यासाठी नगर पालिका अग्नीशमन दलाचे दत्तात्रय पाटील, आबा पाटील, भिकन गायकवाड, राजेश कंडारे, जयराम बजाज व युसुफ पठाण यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. सदर दुकानाला आग शॉटसर्कीट मुळे लागली का ? कोणी लावली ? असे प्रश्न परिसरातून उपस्थित होत आहेत.