मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत ठरलेली अदाकारा आणि नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या सतत चर्चेत आहे. स्टेजवर पाऊल टाकताच आपल्या नृत्याने आणि अदांनी प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी जिथे कार्यक्रम करते तिथे गर्दी ओसंडून वाहते. केवळ स्टेज परफॉर्मन्सपुरती मर्यादित न राहता गौतमीनं आता मनोरंजन विश्वातही दमदार एन्ट्री केली असून, सिनेमे, आयटम साँग्स आणि म्युझिक अल्बम्समधून ती सातत्याने प्रेक्षकांसमोर येत आहे.

अशातच महाराष्ट्राची ‘सेन्सेशन’ ठरलेली गौतमी पाटील ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात झळकणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता. याआधी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनदरम्यानही तिच्या सहभागाबाबत अशाच चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यावेळी गौतमीनं त्या सर्व अफवा फेटाळून लावल्या होत्या. आता पुन्हा एकदा ‘बिग बॉस मराठी 6’च्या पार्श्वभूमीवर तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

या चर्चांवर स्वतः गौतमी पाटीलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट भूमिका मांडली आहे. एबीपी माझाला दिलेल्या या मुलाखतीत गौतमीसोबत प्रसिद्ध गायक अभिजीत जाधवही उपस्थित होता. या दोघांनी एकत्र ‘रुपेरी वाळूत’ हे लोकप्रिय मराठी गाणं रिक्रिएट केलं असून, हे गाणं अभिजीत जाधवने गायले आहे, तर म्युझिक अल्बममध्ये गौतमी पाटील झळकली आहे. सध्या या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात सहभागी होणार का, या प्रश्नावर आधी हसत प्रतिक्रिया देत गौतमी पाटीलनं या रिअॅलिटी शोचं तोंडभरून कौतुक केलं. ती म्हणाली की, “मला बिग बॉससाठी बोलावलं होतं. अभिजीत दादाच्या सीझनवेळीच मला ऑफर आली होती. बिग बॉस हा खूप छान शो आहे. आज बिग बॉसमध्ये गेलं तर लोकांचं करिअर घडतं.” मात्र आपण शोमध्ये सहभागी का होत नाही, याचं कारणही तिनं प्रांजळपणे सांगितलं.
गौतमी पुढे म्हणाली, “माझं न जाण्याचं कारण वेगळं आहे. मी जास्त दिवस आईला सोडून राहू शकत नाही. तीन-चार दिवसांपेक्षा जास्त मी आईशिवाय राहू शकत नाही. तिला सोडणं मला शक्य नाही. हेच माझं मुख्य कारण आहे.” मात्र तरीही तिनं बिग बॉसच्या व्यासपीठावर गेल्यावर मिळणारी लोकप्रियता आणि संधी यांचं कौतुक करत हा शो खरंच बेस्ट असल्याचं नमूद केलं.
दरम्यान, कलर्स मराठीकडून ‘बिग बॉस मराठी 6’चा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, 11 जानेवारीपासून हा बहुचर्चित रिअॅलिटी शो सुरू होणार आहे. मात्र यंदाच्या सीझनमध्ये घरात कोणकोणते स्पर्धक दिसणार, याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. गौतमी पाटील सहभागी होणार असल्याच्या चर्चांना आता तिच्या स्पष्टीकरणामुळे पूर्णविराम मिळाला आहे.



