Home प्रशासन जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या जिल्हा कार्यध्यक्षपदी गौतम वाढे यांची नियुक्ती 

कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या जिल्हा कार्यध्यक्षपदी गौतम वाढे यांची नियुक्ती 

0
161


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यभरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या कास्ट्राईब कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या सक्रिय संघटनेच्या जळगाव जिल्हा कार्यध्यक्षपदी गौतम आधार वाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या या निर्णयाचे जिल्हाभरात स्वागत होत असून, कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गौतम आधार वाढे हे गेल्या अनेक वर्षांपासून पंचायत राज व्यवस्थेत कार्यरत असून, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण प्रशासनाच्या क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेत कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष आर. टी. सोनवणे आणि राज्य कार्यध्यक्ष अनिल सुरडकर यांनी त्यांची जिल्हा कार्यध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. या निवडीमुळे जिल्ह्यातील कर्मचारी वर्गाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गौतम वाढे यांच्या नियुक्तीचे यावल पंचायत समिती, चोपडा पंचायत समिती, रावेर पंचायत समिती व भुसावळ पंचायत समिती येथील सर्व कर्मचारी, सदस्य व संघटक बांधवांनी जाहीर स्वागत केले आहे. त्यांच्या निवडीने संघटनेच्या कामकाजात अधिक गतिशीलता येईल आणि कर्मचारी प्रश्नांची सोडवणूक अधिक सक्षमतेने होईल, असा विश्वास संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

गौतम वाढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संघटनेच्या धोरणांनुसार जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये समन्वय वाढवणे, कर्मचारी हिताचे प्रश्न शासनदरबारी प्रभावीपणे मांडणे आणि संघटना अधिक बळकट करणे हे प्राधान्य ठरणार असल्याचे सांगितले.


Protected Content

Play sound