मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । आज 1 डिसेंबर, आजपासून 2023 च्या शेवटच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. वर्षाचा शेवटचा महिना सुरू होताच महागाईचा आणखी एक मोठा झटका सर्वसामान्यांना बसला आहे. LPG सिलेंडर (LPG Cylinder) आजपासून म्हणजेच, 1 डिसेंबर 2023 पासून, वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून महाग झाला आहे. आधीपासूनच महागाईच्या गर्तेत अडकलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा चाप बसणार आहे.
महिन्याच्या पहिल्याच दिवशी, तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींत 41 रुपयांनी (LPG Price Hike) वाढ केली आहे, तर ही वाढ 19 Kg व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Price) दरांत करण्यात आली आहे. अद्ययावत किमतींनुसार, राजधानी दिल्लीत एका सिलिंडरची किंमत आता 1796.50 रुपये झाली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1728.00 रुपयांवरुन 1749.00 रुपये झाली आहे.
एलपीजी सिलेंडरच्या किमती IOCL वेबसाईटवर अपडेट करण्यात आल्या असून बदललेल्या किमती 1 डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दिवाळीपूर्वी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत 103 रुपयांनी वाढ केली होती आणि 1 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्लीत त्याची किंमत 1833.00 रुपये झाली होती, मात्र 16 नोव्हेंबरला छठ पुजेच्या निमित्तानं एलपीजी सिलेंडवर दिलासा देण्यात आला होता. आणि सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी कमी करत 1755.50 रुपये झाली होती, मात्र वर्षाच्या अखेरच्या महिन्यात पुन्हा एकदा एलपीजीच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर पुन्हा एकदा 41 रुपयांनी वाढवले आहेत.
ताज्या बदलांनंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नव्या किमतींबद्दल सांगायचं तर, नमूद केल्याप्रमाणे, राजधानी दिल्लीत आजपासून 19 किलोचा एलपीजी सिलेंडर 1755.50 रुपयांऐवजी 1796.50 रुपयांना मिळणार आहे. तर कोलकातामध्ये त्याची किंमत 1885.50 रुपयांवरून 1908.00 रुपये करण्यात आली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1728.00 रुपयांवरुन 1749.00 रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरसाठी 1942.00 रुपयांऐवजी 1968.50 रुपये मोजावे लागतील.
एकीकडे व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्यानं बदल पाहायला मिळत आहेत. तर तेल कंपन्यांनी 14 किलोग्रॅम वजनाच्या घरगुती सिलेंडच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. IOCL च्या अधिकृत वेबसाईटवर नमूद करण्यात आल्यानुसार, दिल्लीत घरगुती सिलेंडर 9.3 रुपयांना, कोलकात्यात 929 रुपयांना, मुंबईत 902.50 रुपयांना आणि चेन्नईत 918.50 रुपयांना उपलब्ध आहे.