मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चेंबूर कॅम्प परिसरात गुरुवारी सकाळी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये सात ते आठजण जखमी झाले असून त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेंबूरच्या सीजी गिडवानी रोडवरील कॅम्प परिसरात गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
या ठिकाणी असलेल्या एका सलूनच्या पहिल्या मजल्यावर सलून चालकाचे कुटुंब राहत होते. याच घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यामध्ये सलूनसह बाजूचे दुकान पूर्णपणे उद्वस्त झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत स्थानिक रहिवाशांनी जखमींना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या स्फोटात रस्त्यावरील अनेक वाहनांच्या काचा फुटल्या असून आणखी काहीजण यामध्ये जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून याप्रकरणी आरसीएफ पोलीस अधिक तपास करत आहेत.